धर्मचक्र प्रभाव तीर्थ – विल्होळी
इ.स. 10 व्या व 11 व्या
शतकात यादवांच्या काळात नाशिकात अनेक ठिकाणी खडक तोडून जैन गुँफा, लेण्या तयार
केलेल्या आढळतात. नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी, त्रिंगलवाडी, अनकाई-टनका (मनमाड), हतगड,
म्हसरूळ, चामरलेणी (नाशिक), चांदवड, औंधपट्टा (सिन्नर), अलंग-कुलंग (ईगतपुरी),
मांगी-तुंगी (बागलाण-सटाणा) इ. किल्ल्यांवर जैनांच्या पवित्र तीर्थंकरांच्या
मूर्ती व आकृत्या कोरलेल्या आहेत.
मुंबई-आग्रा महामार्गालगत विल्होळी येथे भव्य असे
जैन मंदिर पाहताक्षणी नजरेस भरते. 11 एकर जागेत पसरलेले हे जैन मंदिर जैन
श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे धर्मस्थळ आहे. अतिशय स्वच्छ वातावरणात येथे
मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग बनवलेला आहे. यात्री निवासस्थान, भोजनशाळा, गुरू
महाराजांचे आराधना भवन, कार्यालय अशा इमारती याठिकाणी दिसतात.
हे जैन मंदिर पूर्वाभिमुख आहे. त्याला दक्षिण व
उत्तर द्वारे देखिल आहेत. या मंदिरासाठी लागणारे दगड राजस्थानमधील बन्सी पहाडावरील
आहे. गुलाबी रंगाच्या या दगडात मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. मंदिराच्या
दोन्ही जिन्यांतून एक मार्ग खालच्या गर्भगृहात जातो. याठिकाणी भगवान महावीरांची
अतिशय देखणी अशी मूर्ती आहे. भगवान महावीर विहार करतानाचा प्रसंग येथे दर्शवलेला
आहे. महावीरांच्या पायाखाली कमलपुष्पे दाखविली आहेत. भगवान महावीरांची मूर्ती
सुमारे 12 फूट उंच आहे. 12 टन वजनाच्या पंचधातूत घडविली आहे.
येथेच आजूबाजूला चौकोनी मांडणीत विविध
मुनींच्या अनेक मूर्ती आहेत. वरच्या गर्भगृहात चौमुखी मंत्राधिराज पार्श्वनाथ
भगवानांची मूर्ती आहे. ही अखंड दगडात कोरलेली असून, गर्भगृहाच्या चार द्वारातून
विविध रूपात दर्शन देते. मंदिराचे खांब अखंड अलंकृत आहे. वरच्या बाजूला घुमटाकार
होत जाणारे छत, त्यातल्या नक्षीदार कमानी, मंदिरांच्या भिंतींना नक्षीदार जाळी,
कोरलेले दगड, कोनाडे, संगमरवरी वेलबुट्टीचे गालिचे आदि आकर्षक आहे.
संपूर्ण मंदिरात मूर्त्यांची संख्या 150 हून
अधिक आहे. मंदिराच्या आजूबाजूला चार छोट्या टेकड्या आहेत. जैनांच्या चार प्रमुख
तीर्थक्षेत्रांचे दर्शन इथे मिळावे म्हणून अबू, गिरणार, शत्रुंजय आणि सम्मेतशिखर
यांच्या प्रतिकृती येथे तयार केल्या आहेत.
सर्व जैन बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा!!!
No comments:
Post a Comment