श्री क्षेत्र नाशिक – सिंहस्थ कुंभमेऴा महापर्व
हरिद्वारे प्रयागे च धारा गोदावरीतटे ।।
सिंहस्थिते ज्ये सिंहर्के नासिके गौतमी तटे ।।1।।
-
(स्कंद
पुराण)
नासिक हे पुरातन प्रसिद्ध हरिहर क्षेत्र आहे. सिंह राशी मध्ये जेव्हा
गुरूचे आगमन होते, तेव्हा सिंहस्थ पर्व काल साजरे केले जाते. या सिंहस्थ पर्वकाळात
तीर्थयात्रा, तीर्थस्नान, दान, प्रायश्चित, गंगाभेट तसेच पितृगणानिमित्त तीर्थश्राद्ध
विधि, नारायण नागबली, त्रिपिंडी, वेदपारायण, भागवत सप्ताह, विष्णुयाग,
महारूद्रयाग, कथा कीर्तन, प्रवचने, अनुष्ठाने इत्यादी धार्मिक विधि करण्याची प्राचीन
परंपरा आहे. या पर्वकाळात देशभरातून अनेक अध्यात्मिक गुरू देखिल शिबिर, सत्संग
आयोजित करतात. म्हणून आपण सर्वांनी या पर्वकाळाचा लाभ घेतला पाहिजे.
नासिकं च प्रयागं च नैमिषं पुष्करं तथा।।
पंचमं च गयाक्षेत्रं षष्ठं क्षेत्रं न विद्यते।।
-
(ब्रम्हांड
पुराण)
नासिक, प्रयाग, नैमिष, पुष्कर आणि गया हीच पाच प्रमुख पवित्र तीर्थक्षेत्रे
आहेत. इतर कोणतेही सहावे तीर्थक्षेत्र नाही. (नासिक, हरिद्वार, प्रयाग आणि
उज्जयिनी) या चार क्षेत्रांतच कुंभमेळा भरतो. श्री क्षेत्र नासिक येथे पंचवटीत
गोदावरी (गौतमी) दक्षिणवाहिनी आहे. सिंहस्थ महापर्वकाल एक वर्षापर्यंत असतो. अनादीकाळापासून
नासिक पंचवटी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरत आहे. पंचवटी येथे रामकुंड तर श्री श्रेत्र
त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थ या ठिकाणी शाहीस्नान केले जाते. यावेळी श्री
गोदावरीच्या अति पुण्यदायक स्नान तसेच ध्वजपर्व च्या पावन प्रसंगंचा लाभ
घेण्यासाठी संपूर्ण भारततातून हजारो बैरागी, उदासी, निर्मोही, निर्वाणी, दिगंबर,
खालसा, गुरूद्वारा, खाकी, रामानुजी, दसनामी इ. साधु, संत, महंत, सत्पुरूष तसेच भारताच्या
कानाकोपरेतून असंख्य भाविक श्रद्धावान, धार्मिकजन यात्रेकरू पूर्व प्रचलित परंपरेनुसार
स्नान व दानाच्या महापुण्याचा लाभ घेतात. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही मिरवणूकांचे
नयनमनोहर दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते.
सिंह राशीमध्ये गुरू ग्रह जोपर्यंत राहतो, तोपर्यंत हे महापर्व चालते.
सर्व तीर्थ, नद्या, समुद्र, क्षेत्र, अरण्य, ऋषी, महर्षी, आश्रम, विहिरी, जलाशय,
पल्लव एवढेच नव्हे तर इन्द्रासह तेहेतीस कोटी सर्व देवता सुद्धा एक वर्षापर्यंत
श्री गोदावरीच्या तटावर निवास तसेच नित्य स्नान करतात. दक्षिणवाहिनी गोदावरीच्या
पवित्र जलात स्नान केल्याने अश्वमेध यज्ञ करण्याचे पुण्यफल प्राप्त होते. अशा या
अनन्य साधारण अध्यात्मिक, धार्मिक महत्त्व असलेल्या सिंहस्थ पर्वकाळात परिसरात
असलेल्या चैतन्यलहरींची अनुभूती शब्दांत सांगता न येण्यासारखी असते.
No comments:
Post a Comment