गड व किल्ले : अंजनेरी
पौराणिक काळापासून अंजनेरीचे अनेक दाखले
इतिहासात सापडतात. पौराणिक कथेनुसार अंजनी मातेच्या पोटी पवनपुत्र हनुमान यांचा
जन्म अंजनेरी येथे झाला, अशी आख्यायिका आहे. ज्या स्थळी पवनपुत्र हनुमानांचा जन्म
झाला, त्या स्थळाचे दर्शनासाठी आजही असंख्य भाविक गडावर जातात. मूळ जन्म स्थळ
गडावर असले तरी गडाच्या पायथ्याशी पवनपुत्र हनुमानांची अतिशय भव्य अशी मुर्तीची
स्थापना केलेली आहे.
अंजनेरी गडाची उंची 4295 फूट इतकी आहे. गडावर
अंजनेरी किल्ला आहे. ऐतिहासिक माहितीनुसार इ.स. 260 च्या सुमारास अंजनेरी ही ईश्वरसेन
(वीरसेन) या अभिर गवळी राजाची राजधानी होती. याचा कोरीव लेख पांडवलेण्यात आहे.
त्याची चांदीची नाणीही उपलब्ध आहेत. इ.स. 710 च्या सुमारास बदामीच्या चालुक्यांची
सत्ता येथे काही काळ होती. इ. स. 710 चा ताम्रपट उपलब्ध आहे, त्यात अंजनेरी
जवळच्या विविध देवालयांसाठी परिसरातील गावांवर बसवलेल्या करांचा उल्लेख आहे.
सिन्नर येथील यादव राजांच्या काळात सेऊणचंद्र
3रा याने इ.स. 1130 ते 1145 च्या सुमारास अंजनेरीहून काही काळ कोकणचा काभार पाहिला
होता. त्यांच्या कारकिर्दीत 1141 चा शिलालेख उपलब्ध आहे. अंजनेरी आणि
परिसराला जैन परंपरेत श्वेतप्रद असे म्हणत. इ.स. 10 व्या व 11 व्या शतकात
यादवांच्या काळात अनेक ठिकाणी खडक तोडून जैन गुँफा, लेण्या तयार केलेल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी, त्रिंगलवाडी, अनकाई-टनकाई, हतगड, म्हसरूळ, चामरलेणी,
अलंग-कुलंग, मांगी-तुंगी इ. किल्ल्यांवर जैनांच्या पवित्र तीर्थंकरांच्या मूर्ती व
आकृत्या कोरलेल्या आहेत. मुस्लिम राजवटीत त्यांची विटंबना झालेली दिसते.
यादवकाळात हा परिसर श्री
ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तिनाथ महाराज व त्यांचे पूर्वजांच्या पदस्पर्शाने पुनीत
झाला आहे. मोगल-मराठा संघर्ष काळात अंजनेरी किल्ल्याचे त्रोटक उल्लेख येतात.
निजामशाहीचे अल्पवयीन निजामशहाला ज्या किल्ल्यावर काही काळ सुरक्षित ठेवले होते
त्यात अंजनेरी किल्ल्याचा उल्लेख येतो. पेशवे काळात राघोबादादा आनंदवलीस
मुक्कामाला असताना थंड हवा खाण्यास ते अंजनेरीला येत असत. सध्या हा गडावर काही
अवशेष वगळता पूर्णतः उध्वस्त झाला आहे.
No comments:
Post a Comment