Friday, April 1, 2016

नाशिकची ओळख : नाशिकची प्रसिद्ध द्राक्षे


नाशिकची प्रसिद्ध द्राक्षे

     प्राचीन काळापासून ज्ञात असलेल्या या रसदार फळाचा स्वाद मधुर आहेच; पण जीवनसत्त्वे आणि औषधी गुणधर्मांनीही ते परिपूर्ण आहे. उन्हाळ्याची चाहूल लागत असताना रसदार द्राक्षांनी परिपूर्ण असणारी दुकाने लक्ष वेधून घेतात. हिरवी, पिवळसर, काळी टपोरी द्राक्षे पाहताक्षणीच खावी असे वाटते. अंगूर, ग्रेप्स या नावांनी द्राक्षे ओळखली जातात. द्राक्ष हे प्राचीन फळ मानले जाते. महर्षी वाग्भट द्राक्षाला "फलोत्तमा' असे संबोधतात. थॉमसन, भोकरी, बंगलोर ब्ल्यू असे द्राक्षाचे प्रकारही आढळतात. आयुर्वेदाने सबीज द्राक्षे श्रेष्ठ तर बिया नसलेली द्राक्षे अल्पगुणी मानली आहेत. काळ्या द्राक्षाचा वापर औषधांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. द्राक्षांपासून जॅम, ज्यूस, जेली, वाइन, व्हिनेगर बनवले जाते. द्राक्षे वाळवून मनुका, बेदाणे बनवले जातात. औषधांसाठी द्राक्षाचे बी, फळ, पाने यांचाही वापर होतो.

द्राक्षाची पौष्टिकता -  द्राक्षात जीवनसत्त्व सी आढळते. त्यामुळे त्वचारोगावर उपयुक्त.  जीवनसत्त्व बी 1, बी 2, बी; तसेच फ्लेवोनाइड्‌स आढळतात, जी शरीरास हितकर असतात.  द्राक्षाचा रंग जेवढा गडद तितकी फ्लेवोनाइड्‌स अधिक असतात.  द्राक्षात कॅल्शिअम, कॉपर, आयर्न, मॅग्नेशिअम, मॅंगनीज, पोटॅशिअम, सल्फर, सिलिकॉन असे पोषक घटक असतात.  द्राक्षात मोठ्या प्रमाणात टार्टारिक व मॅलिक ऍसिड आढळते, त्यात  "हिलिंग प्रॉपर्टीज' असतात.  द्राक्षाच्या सालीतील अँटि ऑक्‍साइड्‌समुळे प्रतिकारशक्ती टिकून राहण्यास मदत होते.  द्राक्षातील फायटोकेमिकल्सचा कर्करोग, हृदयविकाराच्या प्रतिबंधासाठी उपयोग होतो.  त्वरित ऊर्जानिर्मितीसाठी द्राक्षाचा उपयोग होतो.  द्राक्षबियांतील सॅलिसिलेटमुळे रक्त गोठत नाही, प्लेटलेट्‌स चिकटत नाहीत, त्यामुळे ती ऍस्पिरिनसारखी काम करतात.  द्राक्षात ग्लुकोज असल्याने तापाने आजारी रुग्णांना द्राक्ष आवर्जून द्यावे; मात्र मधुमेहींनी द्राक्षाचे फार सेवन टाळावे.  ताजी द्राक्षे योग्य प्रमाणात खाल्ल्यास बद्धकोष्ठतेवर गुणकारी ठरतात.  डोळ्यांच्या आरोग्यासाठी द्राक्षे उपयुक्त असतात.  द्राक्षामध्ये आढळणारे फोलेट गर्भवतींसाठी उपयोगी ठरते. या काळात योग्य प्रमाणात द्राक्षांचे सेवन करावे.  रक्तशुद्धीसाठी द्राक्षाच्या रसाचा (ज्यूस) उपयोग होतो. द्राक्षाची निवड आणि वापर  ताजी, घट्ट द्राक्षे निवडून घ्यावीत. ती सुरकुतलेली नसावीत. पिवळसर द्राक्षे मधुर असतात. गुणकारी द्राक्ष  द्राक्षफळ तोंडाला उत्तम रुची आणि स्वाद आणते.  भूक-तहान शमविण्यासाठीही वापरता येते.  शरीराचे आणि मनाचेही पोषण त्यातून होते.  द्राक्षसेवनाने शरीराला व मनाला उत्साह,ऊर्जा, स्फूर्ती मिळते.  शरीरसंवर्धनासाठी द्राक्ष उपयुक्त ठरते.  अशक्तपणावरही द्राक्षे गुणकारी ठरतात.  औषधी गुणधर्मामुळे द्राक्ष हा उत्तम उपचार समजला जातो.

मनुका - द्राक्ष म्हणजे टंच तारुण्य. मनुका-बेदाणा म्हणजे वाळलेले वार्धक्‍य. द्राक्ष अल्पायुषी, मनुके दीर्घायुषी. मनुके-बेदाणा विक्री हा गंगाघाटावरील एक प्रमुख व्यवसाय आहे.

द्राक्ष निर्यात - द्राक्ष निर्यातीत नाशिक अव्वल आहे. युरोपात नाशिकची द्राक्षे निर्यातीचे नवे विक्रम नोंदवित आहेत. यंदाच्या हंगामात राज्यातून निर्यात झालेल्या द्राक्षांमध्ये सर्वाधिक द्राक्षे नाशिकची (६३ हजार ६०० मेट्रिक टन) असून, त्यापैकी ५५ हजार मेट्रिक टन द्राक्षे युरोपात गेली आहेत. सध्याची आकडेवारी पाहता ही गेल्या काही वर्षांतील सर्वोत्तम वाढ असल्याचे सांगितले जाते. दर्जेदार द्राक्षांचे माहेरघर असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील जवळपास दीड लाख एकर क्षेत्रात द्राक्षपिक घेतले जाते. यात देशी बाजारपेठेसह विदेशी बाजारात आवश्यक निर्यातक्षम द्राक्षांचाही समावेश असतो. यंदा जिल्ह्यातून नेदरलँड, इंग्लंड, जर्मनी, स्वीडन, बेल्जियम, डेन्मार्क, स्पेन, इटली, स्वित्झरलँड, ऑस्ट्र‌िया, पोर्तुगाल, माल्टा, एस्टोनिया, नॉर्वे, लिथ्युनिया यासारख्या युरोपियन देशांत मोठ्या प्रमाणात द्राक्षे निर्यात झाली आहेत.

वाईन उद्योग - देशातील सर्वांत जास्त वाईनरी कंपन्यां असल्याने देशाचे वाईन कॅपिटल अशी नवी ओळख नाशिक जिल्ह्याने निर्माण केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३५ वाईनरी आहेत. त्यांची सुमारे १ कोटी लिटरपर्यंत वाईन उत्पादनाची क्षमता आहे. त्यातील सुमारे ५० लाख लिटर वाईन्स भारतात विकली जाते. तर ७ लाख लीटरपर्यत वाईन निर्यात होते. अल्पावधीत वाईन उद्योग भरभराटीला येण्यामागे येथील भौगोलिक वातावरण आणि पूरक सोयी सुविधा हे प्रमुख कारण आहे.
पेटंट - नाशिक जिल्ह्याचे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, देशात आणि परदेशातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या नाशिकच्या द्राक्षांना अधिकृतपणे पेटेंटचा दर्जा मिळाला आहे. केंद्र शासनाच्या चेन्नई येथील भौगोलिक उपदर्शन पत्रिकेत 31 मे 2010 ला नाशिकच्या द्राक्षांची नोंदणी झाली. भौगोलिक उपदर्शन (जिऑग्राफिकल इंडिकेशन-जीआय) रजिस्ट्री, चेन्नई या संस्थेचे पी.एच. कुरियन तीन दिवस नाशिकमध्ये होते. या तीन दिवसांच्या कालावधीत त्यांनी नाशिकच्या द्राक्षांची पाहणी व अभ्यास केला, त्यानंतर नाशिक ग्रेप्स फार्मर्स या संस्थेतर्फे दाखल करण्यात आलेल्या अर्जाचा विचार करून नाशिकच्या द्राक्षांना बौद्धिक संपदेचा दर्जा दिला.

No comments:

Post a Comment