Showing posts with label Nashik. Show all posts
Showing posts with label Nashik. Show all posts

Friday, March 25, 2016

संत आंद्रिया चर्च



संत आंद्रिया चर्च

     
       नाशिकची ओळख हे धार्मिक क्षेत्र अशी आहे. नाशिकमध्ये हिंदू धर्मियांबरोबर मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी इ. विविध धर्मिय लोक राहतात. आज गुड फ्राइडेच्या निमित्ताने ख्रिस्ती बांधवांचे नाशिकमधील सर्वात पहिले संत आंद्रिया चर्च या चर्च विषयी माहिती घेऊ. शरणपूर रोड येथील संत आंद्रिया चर्च हे शहरातील सर्वात पुरातन चर्च आहे. सन 1824 मध्ये शहरात कॉलराची साथ आली होती. वैद्यकिय सेवेअभावी रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढतच होते. त्यावेळी मुंबई येथील मिशनरी सोसायटीचे काही मिशनरी येथे रूग्णसेवेसाठी दाखल झाले. त्यात रेव्हरंड विल्यम प्राइस हे देखिल होते. 1850 ते 1900 या काळात कॅनडा कॉर्नर, शरणपूररोड परिसरात संपूर्ण जंगल होते. 


एकदा विल्यम घोड्यावरून रपेट मारत असताना त्यांच्या घोड्याच्या पायाला दुखापत झाल्याने घोडा जागीत थांबला. अनेक प्रयत्न करूनही घोडा पुढे जात नसल्याने त्यांनी हे दैवी संकेत समजून येथेच मिशनरी संस्थेच्या कार्यासाठी 100 एकर जागा खरेदी केली. या जागेवर एक लहानसे प्रार्थनास्थळ चॅपल बांधले. निराधार विधवांच्या निवासासाठी धर्मपुरी ही चाळ बांधली. सध्याचे जुने पोलीस आयुक्तालय हे पूर्वीचे बायबल कॉलेज होते.
      प्रार्थनास्थळ लहान पडू लागल्याने सन 1892 मध्ये 4 एकर जागेवर 60 X 40 एवढ्या जागेत संत आंद्रिया चर्च बांधण्यात आले. त्याकाळात या चर्चच्या बांधकामाला 19000 रू इतका खर्च आला. चर्चचे बांधकाम 280 दिवसात पूर्ण झाले. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे क्रॉसच्या आकारात संपूर्ण दगडी बांधकाम करण्यात आले. यासाठी वापरण्यात आलेले दगड चामर लेणी डोंगरावरून आणण्यात आले. चुना व मातीचा वापर करून हे बांधकाम करण्यात आले. येथे एकावेळी 250 समाजबांधव प्रार्थना करू शकतात.
      संत आंद्रिया चर्च हे नाशिक जिल्ह्यातील पहिले चर्च आहे. प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव तथा नाताळाच्या निमित्ताने चर्चमध्ये सजावट, रंगरंगोटी, रोषणाई करण्यात येते. तसेच ख्रिस्तजन्माचा गव्हाणीचा देखावा उभारण्यात येतो. चर्चसह परिसर व रस्ता रोषणाईने उजळून निघाल्याने चैतन्यमय वातावरणाची निर्मिती होते.

Saturday, March 19, 2016

जागतिक चिमणी दिन



जागतिक चिमणी दिन


या चिमण्यांनो, 
परत फिरा रे....
घराकडे आपुल्या.....

           निसर्गाची ओळख मानवाला प्रथम चिमणीपासूनच होते. एक घास चिऊचा... सांगतच आपली आई आपणास एक-एक घास भरवते. कुठेतरी प्रत्येकाचे बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे. चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले. कविता, बडबडगीते यांतच चिमणी शिल्लक राहते की काय अशी भिती वा़टू लागली आहे. शहरात मातीच्या भिंती, कौलारू घरे पहावयास मिळत नाहीत. अंगणात धान्य निवडणारी महिला आता दिसत नाही, अंगणही राहिले नाही तर अंगणात उड्या मारत धान्य टिपणारी , बागडणारी चिमणी कुठे दिसणार? सीमेंटच्या जंगलात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली. अपवादाने वृक्ष नजरेस पडतात.
  "नेचर फॉरेव्हर सोसायटीया संस्थेच्या पुढाकाराने हा दिवस साजरा करायला 2010 मध्ये सुरवात झाली. पहिल्याच वर्षी जगभरातून या मोहिमेला प्रतिसाद मिळाला. पहिला जागतिक चिमणी दिवस - २० मार्च २०१० रोजी पाळला गेला. तेव्हापासून मार्च २० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून दरवर्षी पाळला जातो. चिमण्या पुस्तकात उरतील... चिमण्या कवितेत उरतील... ज्या विलक्षण वेगाने चिमण्या नाहीशा होत आहेत; त्या गतीने हा भयावह भविष्यकाळ अगदीच अशक्‍य राहिलेला नाही, हे आजचे वास्तव आहे. आज "जागतिक चिमणी दिनसाजरा होत असताना "परत फिरा रे...अशी चिमण्यांना आर्त आळवणी करण्याची वेळ माणसांवर आली आहे...
       




नाशिकमधील स्तुत्य उपक्रम

नाशिक महापालिकेने चिमण्यांच्या संवर्धनासाठी एक अतिशय स्तुत्य निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे घर बांधणीची परवानगी देताना चिमण्यांना घरटे करण्यासाठी बाहेरून एक भोक ठेवणे बंधनकारक आहे. त्याचे भान आता प्रत्येक नागरिकाने घर बांधणीच्या वेळी ठेवायला हवे. नाशिकमधीलच हिरवळ फौंडेशनने चिमण्यांसाठीची देखणी "घरेबनविली आहेत.

 
 
चिमण्यांनाही द्या जागा...
- फ्लॅट, घराच्या टेरेसवर, खिडकीत चिमण्यांसाठी दाणा-पाणी ठेवा. चिमण्यांना पाण्यात खेळायला प्रचंड आवडते.
-
घरात काही वस्तूंची (बूट, चप्पल इत्यादी) रिकामी खोकी पडलेली असतात. त्यांना चिमण्या आत जाईल, असे भोक पाडून, घराबाहेर खिडकीच्यावर उंच जागेवर टांगले तर तेथे चिमण्या घरटे करतील.
-
शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्यांपासून त्यांना खाद्य भरवायचे फिडर बनवू शकतो.
- घराजवळच्या मोकळ्या भूखंडावर, कॉलनीतील रस्त्यांच्या कडेला लहान झुडुपवर्गिय रोपांची लागवड करा. व संवंर्धन करा.
- चिमण्यांसाठी नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देण्यासाठी बाभूळ वृक्षाची लागवड व संवर्धन करा. यावर चिमण्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आढळून येतो. बाभूळावर त्या आनंदाने वास्तव्यास असतात.
- घराच्या टेरेस, बाल्कनीत कुंड्यात जेथे झाडे लावलेली आहेत अशा जागी बर्ड फिडर लावा. चिवचिवाटाने भकास, ओसाडपणा जाऊन जागेच्या सौंदर्यात भरच पडेल.
        "नेचर फॉरेव्हर सोसायटीया संस्थेच्या  या उपक्रमाने मोठी जनजागृती झाली आहे. पक्षी निरीक्षणासाठी लांबवर जाण्याची गरज नाही; कारण सभोवताली चिमण्या, कावळे, कबुतरे, पोपट असे किमान 18 प्रजातींचे पक्षी वावरत असतात. त्यांचे केवळ निरीक्षणच करणे हा या मोहिमेचा एकमेव हेतू नसून, पक्ष्यांच्या या प्रजाती वाढत्या शहरीकरणामुळे नामशेष होत चालल्यामुळे त्या प्रजातींच्या संवर्धनास मदत करणे, हा मुख्य उद्देश आहे. मात्र काळानुरूप बदलत्या जीवनशैलीमुळे चिऊताई मानवापासून दुरावली. मानवाचा सहवास प्रिय असणारे चिऊताईला पुन्हा अंगणात बोलविण्यासाठी मानवानेच पुढाकार घेणे गरजेचे असून, त्या दिशेने पाऊले उचलण्याची वेळ आली आहे.


        जसे चिऊताईचे तसेच लव्ह बर्डचे पण होत आहे. निसर्गाची शोभा वाढवणारे हे सुंदर रंगबिरंगी पक्षी आता सिमेंटच्या जंगलात पिंजरात बंदिस्त ठेवण्यात येतात. अनेकांना आपण किती पर्यावरण प्रेमी व पक्षी प्रेमी आहोत याचे प्रदर्शन मांडायची हौस असते. असे लोक असे पक्षी विकत आणून ठेवतात. मोकळ्या वातावरणात बागडणारे हे पक्षी कोंडमारा होऊन व त्यांची योग्य काळजी न घेतल्याने 2-3 महिन्यातच मरून जातात. पक्षांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवा.

चिमण्यांचे वास्तव्य धोक्यात आलेले आहे. 
चिमण्या वाचवा, जग वाचवा.