श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर
प्राचीन परंपरेची पार्श्वभूमी प्राप्त झालेली
पुण्यभूनगरी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर होय. भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी
आपल्या महाराष्ट्र राज्यात चार ज्योतिर्लिंग आहेत. च्यापैकीच एक ज्योतिर्लिंग
त्र्यंबकेश्वर, नाशिक हे होय. ज्योतिर्लिंग स्वरूप भगवान त्र्यंबकराजाच्या
वास्तव्याने पुनीत झालेली, पवित्र गोदावरीच्या जलधारेने धन्य झालेली तपोभूमी
म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. परब्रम्ह भगवान शिव येथे ब्रम्हागिरीच्या
रूपाने या क्षेत्राचे अधिष्ठान बनले. येथेच तप करून ब्रम्हद्रवरूपा गोदावरीच्या
मूल जलधारेचे भगवान शंकरांच्या जटेतून उगम झा ले.
त्र्यंबकेश्वर म्हणजेच त्रि अंबक - 3 डोळे असलेले
ईश्वर. येथे लिंगाच्या जागी स्वयंभू शालुका आहे. त्यात अंगठ्याच्या आकाराचे तीन
लिंगे ब्रम्हा, विष्णु व महेश या स्वरूपात आहेत. भगवान त्र्यंबकेश्वर महामृत्युंजय महादेव हे या
नगरीचे अधिष्ठान होय. त्र्यंबकेश्वर या हेमाडपंती मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत
बाळाजी बाजीराव पेशवे यांनी सुरु केला. मार्गशिर्ष कृष्ण 8 शके 1755 साली
त्र्यंबकेश्वर मंदिराची मुहूर्तमेढ रोवली. सुमारे 768 मजूर कामावर होते. इ. स.
1755 ते 1785 अशी 30 वर्षे अथक मेहनत घेऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवेंच्या
कारकिर्दित हे काम पूर्ण झाले.
मेरू व मालवा या वास्तु शिल्परचनेवर आधारित च्या
काळचे वास्तूशिल्पकार यशवंतराव हर्षे यांनी हे मंदिर बांधले. तसा शिलालेख
प्रवेशद्वारावर लिहिलेला आहे. मंदिराचा दक्षिणोत्तर परिसर 218 फूट व पश्चिमोत्तर
परिसर 265 फूट आहे. आतील सभामंडप 40 X 40 फूट आहे. पुरातन
स्थापत्यकलेचा अप्रतीम नमुना असे हे मंदिर दिमाखात उभे आहे. कोनाड्यात भैरव मुर्ती
व अन्य देवादिकांच्या मूर्ती बसविल्या आहेत. देवालयावर 3 सुवर्ण कलश व वृषभ
चिन्हांकित सुवर्णध्वज पेशव्यांचे सरदार विंचुरेकर यांनी 5-10-1872 ला बसविले. मंदिराच्या
शिल्पकलेला साजेल असेल सुवर्ण मुर्ती व कलाकुसरीने युक्त सुवर्ण रत्नजडीत मुकुट
आहे. प्रत्येक सोमवारी पालखी सोहळ्यानंतर भाविकांसाठी दर्शनार्थ ठेवले जाते.
सुप्रसिद्ध कुशावर्त तीर्थ हे दगडी शिल्प येथे
आहे. होळकर सरकारांचे फडणवीस रावजी महादेव पारनेरकर यांनी शके 1672 ते 1690 या
काळात ते बांधले. दक्षिणोत्तर 74 फूट, पूर्वपश्चिम 81 फूट असा परिसर आहे. दर 12
वर्षांनी येणारे सिंहस्थ कुंभमेळ्यात सर्वतीर्थ व नद्या तीर्थराज कुशावर्तावर
मुक्कामाला येतात. भारतातील लक्षावधी साधुसंत, महामंडलेश्वर, महात्मे येथे
कल्पवासासाठी येतात. कल्पवास म्हणजे पर्वकाल पूर्ण होईपर्यंत त्या पुण्यक्षेत्रात
व्रतस्थ राहून तप करणे. या पर्वकाळात येथे येणारे शैव पंथी व नागा साधु हे येथील
वैशिष्ट्य होय.
भगवान त्र्यंबकराजांची अर्धांगिनी जगन्माता
पार्वती अन्नपुर्णा होऊन ज्यांना या क्षेत्रांत ज्ञान-वैराग्याची भिक्षा वाढून
ज्ञानतृप्त बनविते, आनंदाचे ढेकर देऊन सिद्धयोगी जेथे ब्रम्हनिष्ठेचा आनंद लुटतात
ते हे सिद्धक्षेत्र त्र्यंबकेश्वर आहे. या तीर्थास त्रिसंध्या क्षेत्र असेही
म्हणतात.
येथे भागीरथी गंगेची वडिल बहीण गौतमी गंगा आहे,
हे काशीपेक्षाही श्री त्र्यंबकेश्वराचे वैशिष्ट्य हे आहे. कृतयुगांत जन्मलेली
गोदावरी ब्रम्हर्षि गौतमासाठी आली व त्रेतायुगांत जन्मलेली, राजर्षिसाठी आलेली
भागीरथी युगप्रकर्षाच्या दृष्टीनेही थोर आहे. नर्मदेनर तप करावे, मरण काशीला यावे
व दान कुरूक्षात्रांत करावे असे म्हणतात. पण या तिन्ही गोष्टी ‘तत्त्रयं गौतमीतटे’ गोदावरीच्या
तीरावर कराव्यात.
गौतम
ऋषिंची तपोभूमि, संत निवृत्तिनाथांची समाधिभूमि व लाखो यात्रेकरूंची दानभूमि त्र्यंबकेश्वर
आहे. काशी येथे भगवान शिव एकटे राहतात, त्यामुळे ती ज्ञानवैराग्यसाठी आहे.
त्र्यंबकेश्वर येथे भगवान शिव भगवान विष्णु व ब्रम्हदेवासह राहतात. त्र्यंबकरूपाने
राहतात. भगवान विष्णुमुळे ऐश्वर्य व ब्रम्हदेवामुळे वाणीचे वैभव मिळते असे या श्री
त्र्यंबकेश्वराचा तपश्चर्यावैभवाचा महिमा आहे.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे
काष्ठशिल्पाचा ऐतिहासिक ठेवा असा लाकडी मोठा रथ आहे. प्रतिवर्षी कार्तिक
पौर्णिमेला रथोत्सवात तो वापरतात. या व्यतिरिक्त येथे गौतमतीर्थ, गंगासागर तीर्थ,
इंद्रतीर्थ, गंगाद्वार, श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर इ. प्रसिद्ध ठिकाणे
आहेत.
‘महेश्वरत्र्यंबकएवनापरः’ असे महाकवि कालीदासनेही म्हटले आहे त्या भगवान त्र्यंबकराजांच्या चरणी
कोटिकोटि प्रणाम!!!
No comments:
Post a Comment