Friday, March 25, 2016

संत आंद्रिया चर्च



संत आंद्रिया चर्च

     
       नाशिकची ओळख हे धार्मिक क्षेत्र अशी आहे. नाशिकमध्ये हिंदू धर्मियांबरोबर मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी इ. विविध धर्मिय लोक राहतात. आज गुड फ्राइडेच्या निमित्ताने ख्रिस्ती बांधवांचे नाशिकमधील सर्वात पहिले संत आंद्रिया चर्च या चर्च विषयी माहिती घेऊ. शरणपूर रोड येथील संत आंद्रिया चर्च हे शहरातील सर्वात पुरातन चर्च आहे. सन 1824 मध्ये शहरात कॉलराची साथ आली होती. वैद्यकिय सेवेअभावी रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढतच होते. त्यावेळी मुंबई येथील मिशनरी सोसायटीचे काही मिशनरी येथे रूग्णसेवेसाठी दाखल झाले. त्यात रेव्हरंड विल्यम प्राइस हे देखिल होते. 1850 ते 1900 या काळात कॅनडा कॉर्नर, शरणपूररोड परिसरात संपूर्ण जंगल होते. 


एकदा विल्यम घोड्यावरून रपेट मारत असताना त्यांच्या घोड्याच्या पायाला दुखापत झाल्याने घोडा जागीत थांबला. अनेक प्रयत्न करूनही घोडा पुढे जात नसल्याने त्यांनी हे दैवी संकेत समजून येथेच मिशनरी संस्थेच्या कार्यासाठी 100 एकर जागा खरेदी केली. या जागेवर एक लहानसे प्रार्थनास्थळ चॅपल बांधले. निराधार विधवांच्या निवासासाठी धर्मपुरी ही चाळ बांधली. सध्याचे जुने पोलीस आयुक्तालय हे पूर्वीचे बायबल कॉलेज होते.
      प्रार्थनास्थळ लहान पडू लागल्याने सन 1892 मध्ये 4 एकर जागेवर 60 X 40 एवढ्या जागेत संत आंद्रिया चर्च बांधण्यात आले. त्याकाळात या चर्चच्या बांधकामाला 19000 रू इतका खर्च आला. चर्चचे बांधकाम 280 दिवसात पूर्ण झाले. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे क्रॉसच्या आकारात संपूर्ण दगडी बांधकाम करण्यात आले. यासाठी वापरण्यात आलेले दगड चामर लेणी डोंगरावरून आणण्यात आले. चुना व मातीचा वापर करून हे बांधकाम करण्यात आले. येथे एकावेळी 250 समाजबांधव प्रार्थना करू शकतात.
      संत आंद्रिया चर्च हे नाशिक जिल्ह्यातील पहिले चर्च आहे. प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव तथा नाताळाच्या निमित्ताने चर्चमध्ये सजावट, रंगरंगोटी, रोषणाई करण्यात येते. तसेच ख्रिस्तजन्माचा गव्हाणीचा देखावा उभारण्यात येतो. चर्चसह परिसर व रस्ता रोषणाईने उजळून निघाल्याने चैतन्यमय वातावरणाची निर्मिती होते.

No comments:

Post a Comment