Saturday, June 20, 2020

जागतिक योग दिन 21 जून

जागतिक योग दिन 21 जून

 

     भारतासह जगभरात आज (21 जून) आंतरराष्ट्रीय योग दिनाची (International Yoga Day) धूम सुरू झाली आहे. भारतीय प्राचीन परंपरेचा एक भाग असलेला 'योगाभ्यास' आता जगभर पसरला आहे. 21 व्या शतकामध्येही अत्याधुनिक वैद्यशास्त्रासोबत योगाभ्यास करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आता संशोधकांनीही मान्य केले आहेत. त्यामुळे आज जागतिक योग दिनाचं औचित्य साधून या दिवसाचं तुम्हीही नियमित योगाभ्यासाला काही वेळ काढायला नक्की सुरूवात करा. 

योग म्हणजे काय?

      योग हा शब्द 'युज' या संस्कृत धातू पासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे.संस्कृतच्या युज आणि योक या दोन शब्दांनी मिळून योग हा शब्द तयार झाला आहे. युजचा अर्थ जोडणे, बांधणे असा होतो तर योकचा अर्थ एकाग्रचित्त, मनाची एकाग्रता, विचार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे असा होतो. 

     योग ही भारतातील पाच हजार वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे, ज्यात शरीर ताणले, वाकवले, पिळले जाते आणि अवघड श्वसन प्रक्रियांचा अवलंब केला जातो. खरेतर मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणाऱ्या या विज्ञानाची ही म्हणजे योगाभ्यासाची केवळ वरवरची ओळख झाली. योगाभ्यासामध्ये जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो.

      योग म्हणजे शरीराचे अवयव, मनातील भावना आणि अध्यात्म यांचा समन्वय होय. योग आपल्या जीवनातील मानसिक ताण-तणाव कमी करून आपल्या शरीरातील सर्व नाड्यांचे शुद्धीकरण करतो. योग ही आध्यात्मिक वाट असून त्या वाटेवर चालून आपण आपले ध्येय गाठू शकतो. अर्थातच, ते ध्येय गाठण्यासाठी त्या वाटेवरचे नियम पाळावेच लागतील.

     सात्त्विक जीवनशैली, संस्कारक्षम नियंत्रित मन आणि सात्त्विक विचार या तिघांचा एकत्रित परिणाम आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळेच परिमाण देतो. जो मनुष्य या तीनही नियमांचा विचारपूर्वक उपयोग करतो, अर्थातच त्याचा स्वत:च्या मनावर पूर्णत: ताबा असतो. एकदा का त्याचे मन शांत झाले, की शरीरसुध्दा पूर्णत: त्याच्या ताब्यात असते. योग करण्याने सात्त्विक वैचारिक पातळीचा उच्चांक गाठला जातो, जो त्याच्या बदललेल्या जीवनशैलीत उठून दिसतो.


योगाचे मूळ

योगशास्त्राचे उगमस्त्रोत  भगवान शिव हे आहेत. योगाचे मूळ दोन गोष्टींमध्ये सामावलेले असते. एक शारीरिक आणि दुसरे आध्यात्मिक. शारीरिक मुळात आसन, क्रिया, आणि प्राणायाम यांचा समावेश असतो. या सर्वांचा योग्य अभ्यास शरीरास योग्य आध्यात्मिक यश दोतो. योग गुरू या सर्वांचे एक जिवंत उदाहरण आहे. 

अर्थ आणि परिभाषा

      जेव्हा मनाला एकाग्र करून ध्यानावस्थित रूपात जीव परमात्म्या बरोबर मीलनाची आकांक्षा करत असते तोच योग आहे. योगासनांना आधुनिक जीवनात फक्त व्यायामच मानले जाते. इंग्रजीमध्ये याला योगच्या ऐवजी 'योगा' संबोधिले जाते. योगाचे कित्येक प्रकार शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक हालचालींना आपल्या ताब्यात ठेवतात ज्यांचा उद्देश असतो की मनुष्याला आपल्या स्वरूपाच्या बाबतीत ज्ञान मिळवणे हेच मानव जीवनाचे परम लक्ष्य मोक्ष प्राप्त करणे.
     योग वैदिक/हिंदू तत्त्वशास्त्रात सहा विचारधारांमध्ये दर्शनांमध्ये एक आहे. इथे याचे तात्पर्य राजयोगाबरोबर आहे, जो एक ब्रह्मन्‌ मिळविण्यासाठी ईश्वरीय ध्यानाचा राजसी मार्ग आहे.
हिंदू संस्कृतीत योगाचे कित्येक प्रकार पण आहेत उदा. निष्काम कर्म योग, आत्महित विहीन भक्ति योग आणि ज्ञान योग (विवेकपूर्ण ध्यान).
      योगावर पतञ्‍जलि मुनींनी जवळजवळ इ.स.पू. १५० मध्ये योगसूत्र लिहिले. पतंजलीच्या अनुसार अष्टांग योगाचे पालन करणारी व्यक्ति आपल्या मनाला शांत करू शकते आणि शाश्वत ब्रह्मात सामावू शकते. याच अष्टांग पथा ने नंतर येणाऱ्या राज योग, तंत्रयोग आणि बौद्ध (वज्रयान) योगाचा पाया घातला.

 योगदर्शन 

आस्तिक सहा दर्शनांपैकी योगदर्शन हे एक दर्शन होय. येथे दर्शन शब्दाचा अर्थ तत्त्वज्ञान असा आहे. वेदांना प्रमाण मानणारी न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, कर्ममीमांसा आणि ब्रह्ममीमांसा अशी सहा दर्शने प्रसिद्ध आहेत. चार्वाकाचा भौतिकवाद , बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन ही तीन वेद प्रमाण न मानणारी म्हणजे नास्तिक दर्शने होत. चार्वाकाचे दर्शन सोडल्यास बाकीची दर्शने पुनर्जन्मपरंपरा मानतात आणि या जन्मपरंपरेतून सुटका म्हणजे मोक्षही मानतात. मोक्षप्राप्तीचे साधन तत्त्वज्ञान होय. तत्त्वज्ञान चित्तशुद्धीने मिळते व चित्तशुद्धी योगसाधनेने प्राप्त होते. मनाची एकाग्रता म्हणजे योग होय. मनाच्या म्हणजे चित्ताच्या सर्व वृत्तींचा निग्रह करण्यानेच मनाची एकाग्रता सिद्ध होऊ शकते. योग हे तत्त्वदर्शनाचे साधन म्हणून चार्वाकाशिवाय इतर सर्व दर्शनांमध्ये मान्य झालेले आहे. हा सर्व दर्शनांचा समान सिद्धांत आहे. म्हणून  ⇨ अष्टांगयोग या सर्व दर्शनांनी मान्य केला आहे. या सर्व दर्शनांमध्ये मुमुक्षूकरता योगसाधनेचा उपदेश केलेला आढळतो. परंतु वर निर्दिष्ट केलेल्या षड्दर्शनांपैकी योगदर्शन हे स्वतंत्र दर्शन पातंजल योगसूत्र म्हणून उपलब्ध आहे. पातंजल म्हणजे पतंजलींनी तयार केलेले. हे सांख्य दर्शनातील तत्त्वज्ञानावर आधारलेले आहे.

    सांख्य दर्शनाचे सेश्वर सांख्य म्हणजे ईश्वर मानणारे सांख्य दर्शन आणि निरीश्वर सांख्य म्हणजे ईश्वराचे अस्तित्व न मानणारे सांख्य दर्शन असे दोन संप्रदाय प्रसिद्ध आहेत. पातंजल योगसूत्र हे सेश्वर  ⇨ सांख्य दर्शना वर आधारलेले दर्शन आहे. त्रिगुणात्मक प्रकृती व पुरुष अशी मूलभूत दोन तत्त्वे सांख्य दर्शनाचे दोन्ही संप्रदाय मानतात. त्यांपैकी सेश्वर सांख्य दर्शन पुरुष या तत्त्वाचे दोन प्रकार मानतात. एक म्हणजे संसार भोगणारे अनंत जीवात्मे  हेच पुरुष होत आणि दुसरा नित्य मुक्त ,  सर्वज्ञ ,  विश्वाच्या उत्पत्ति-स्थिति-लयाला कारण असा श्रेष्ठ पुरुष म्हणजे परमेश्वर.

योगाचा इतिहास

      योग दहा हजार पेक्षा जास्त वर्षापासून प्रचलित आहे. या परंपरेचा उल्लेख नारदीय सुक्त आणि सर्वात प्राचीन अश्या ऋग्वेदामध्ये आढळतो. हा आपणास पुन्हा सिंधू-सरस्वती सभ्यतेचे दर्शन घडवतो. या सभ्यतेमधील पशुपतीनाथांच्या एका नाण्यावर योगमुद्रा विराजमान आहे जी त्या काळातील योगाच्या व्यापकतेचे द्योतक आहे. अतिप्राचीन उपनिषद बृहद अरण्यक मध्ये योगामधील काही शारीरिक आसनांचा उल्लेख आढळतो. छान्दोग्य उपनिषदामध्ये प्रत्याहार चा तर बृहद अरण्यक मधील एका स्तवनामध्ये प्राणायाम चा सविस्तर उल्लेख आहे. प्रचलित योगाच्या स्वरूपाचा प्रथम उल्लेख कठोपनिषदमध्ये आहे जी आयुर्वेदाच्या कथा शाखामधील अंतिम आठ वर्गांमध्ये पहिल्यांदा येते जे मुख्य आणि अत्यंत महत्वाचे उपनिषद आहे. येथे योगाला अंतर्मनाच्या यात्रेसाठी तसेच चेतनेच्या विकासासाठी गरजेच्या प्रक्रियेच्या रुपात जाणले जाते.
       प्रसिद्ध संवाद “योग याज्ञवाल्क्य”, जो बाबा याज्ञवल्क्य आणि शिष्या गार्गी यांच्यामधील संवाद आहे, ज्याचे वर्णन बृहद अरण्यक उपनिषदमध्ये आहे, यामध्ये श्वास घेण्याचे कित्येक व्यायाम प्रकार, शारीरिक शुध्दतेसाठी गरजेची आसने आणि ध्यानाचा उल्लेख आहे. गार्गी लिखित छांदोग्य उपनिषद मध्ये देखील योगासनांचा उल्लेख आहे.
      अथर्ववेद मध्ये संन्याश्यांच्या एका समुहामधील चर्चेनुसार शारीरिक आसने हि योगासने म्हणून विकसित होऊ शकतात यावर भर दिला आहे. विविध संहितांमध्ये असा उल्लेख आढळतो कि प्राचीन काळी मुनी, महात्मा आणि विविध संतांद्वारे कठोर शारीरिक आचरण, ध्यान आणि तप केले जात असे.
काळानुसार योग एक आचरणाच्या रुपात प्रसिध्द होत गेला आहे. भगवत गीतेसह महाभारतातील शांतिपर्वा मध्ये योगाचा खुलासेवार उल्लेख आढळतो.
      महाभारत आणि भगवत गीतेच्या फार पूर्वी वीस पेक्षा ज्यादा उपनिषदामध्ये सर्वोच्च चेतनेसोबत मनाचे मिलन होणे म्हणजे ‘योग’ असे सांगितले गेले आहे. हिंदू दर्शनातील प्राचीन मुलभूत सूत्रांच्या रुपामध्ये योगाची चर्चा आहे, ज्यांचा अलंकृत उल्लेख पतंजली योग सूत्रमध्ये आहे. महर्षी पतंजली आपल्या दुसऱ्याच योग सूत्र मध्ये योगाची व्याख्या
“योगः चित्त-वृत्ती निरोधः “ – योग सूत्र १.२
अशी करतात. पतंजलींचे लेखन देखील अष्टांग योग साठी आधार बनले आहेत. जैन धर्मातील पांच प्रतिज्ञा आणि बौध्द धर्मातील योगाचाराची बीजे पतंजली योग सूत्रामध्ये आहेत.
मध्य कालीन युगात हठ योगाचा विकास झाला.

योग ग्रंथ : पतंजली योग सूत्र

       महर्षी पतंजली योग पित्याच्या रुपात जाणले जातात आणि त्यांची योग सूत्रे पूर्णपणे योगिक ज्ञानासाठी समर्पित आहेत. 'पतंजली योग सूत्र' या प्राचीन ग्रंथावरील गुरुदेवांची अमुल्य प्रवचने आपल्याला योग ज्ञानाबाबत लाभान्वित करतात तसेच योगाची उत्पती आणि उद्देशांबाबत माहिती करून देतात. योगाची तत्वे, सिद्धांत बनवणे आणि सूत्रांना समजण्यास आणखी सोपे बनवणे हाच या योगसूत्रांचा उद्देश आहे. यामध्ये योग जीवनशैलीचा उपयोग योगाच्या अंतिम लाभांचा अनुभव होण्यास सहाय्यभूत अश्या आपले लक्ष केंद्रित करणाऱ्या काही प्रक्रियांचा उल्लेख आहे.
       गुरुदेवांनी देखील योगसूत्र उपनिषदांचा खूप खुलासा केला आहे. भगवत गीता वरील आपल्या प्रवचनामध्ये त्यांनी सांख्ययोग, कर्मयोग, भक्तियोग राजगुह्य योग आणि विभूतियोगासारख्या योगाच्या विविध अंगावर प्रकाश टाकला आहे.


योगाचे प्रकार

    राज योग : ज्याची पुढे जाऊन आठ अंगांमध्ये विभागणी केली आहे त्यालाच अष्टांग योग म्हणतात. योगाच्या विविध पद्धती आणि प्रक्रिया यांना संतुलित आणि एकत्र करून योगासनांचा अभ्यास करणे हेच राजयोगाचे सार आहे.


    योगाचे प्रकार

     योगामध्ये विविध प्रकारचे अभ्यास आणि पध्दती यांना समाविष्ट केले आहे. भारतीय योग शास्त्रा मध्ये पाच योग सांगितले आहेत -
    • ज्ञान योग -- आत्मज्ञान, / दर्शन शास्त्र
    • हठ योग -- आसन आणि कुंडलिनी जागृति
    • कर्म योग -- योग: कर्मसु कौशलम् (कर्मात कुशलता आणणे म्हणजे योग) / सुखमय कर्म मार्ग
    • भक्ति योग -- भजनं कुर्याम्-भजन करावे. / भक्ती – आनंदाचा मार्ग
    • राजयोग -- योगः चित्तवृत्तिनिरोधः (चित्तातील वृत्तींवर नियंत्रण ठेवणे हाच योग आहे)
    पतंजलीने योगा चा अर्थ चित्तातील वृत्तींचा निरोध (योगः चित्त-वृत्ति निरोध:) सांगितला आहे· त्याच्या विचारांनुसार योगाची आठ अंगे आहेत:
    • यम - (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह) बाहेरचे अंग
    • नियम - (स्वाध्याय, संतोष, तप, पवित्रता, आणि ईश्वराप्रती चिंतन) बाहेरचे अंग
    • योगासन - बाहेरचे अंग
    • प्राणायाम - बाहेरचे अंग
    • प्रत्याहार - बाहेरचे अंग
    • धारणा - आतले/मानसिक अंग
    • ध्यान - आतले/मानसिक अंग
    • समाधी - आतले/मानसिक अंग
    योगश्चित्तवृत्ति निरोधः
    या सूत्राचा अर्थ आहे - योग तो आहे, की जो देह आणि चित्त यांच्या ओढाताणीत मानवाला अनेक जन्मांपर्यंत आत्म-दर्शनापासून वंचित रहाण्यापासून वाचवतो. चित्तवृत्तींच्या निरोधाने (दमनाने) नाही, तर त्या जाणून त्यांना उत्पन्नच न होऊ देणे होय.
         योगाचा मूळ सिद्धान्त ध्यान आणि आसनांच्या माध्यमातून दैहिक आणि मानसिक पूर्णता प्राप्त करणे होय. याचे प्रारंभिक स्वरूप हिन्दू ग्रंथांमध्ये - महाभारत, उपनिषद, पतञ्जलीचे योगसूत्र आणि हठयोग प्रदीपिका मध्ये मिळतात.
          योग एक पूर्ण विज्ञान आहे, एक पूर्ण जीवन शैली आहे, एक पूर्ण चिकित्सा पद्धति आहे आणि एक पूर्ण अध्यात्म विद्या आहे. योगाच्या लोकप्रियतेचे रहस्य हे आहे की लिंग, जाति, वर्ग, संप्रदाय, क्षेत्र आणि भाषाभेदांच्या संकीर्णतांमध्ये कधी आबद्ध न असणे होय. चिंतक, बैरागी, अभ्यासी, ब्रह्मचारी, गृहस्थ कोणीही याचे सानिध्य प्राप्त करून लाभांन्वित होऊ शकतात. व्यक्तींच्या निर्माणात आणि उत्थानामध्येच नाही तर परिवार, समाज, राष्ट्र आणि विश्वाच्या चहूमुखी विकासामध्येही याचा उपयोग सिद्ध झाला आहे. योग मनुष्याला सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठी एक अद्भुत विद्या आहे, जिला हजारो वर्षपूर्वी भारताच्या प्रज्ञावान ऋषि-मुनींनि आविष्कृत केले होते. महर्षि पतंजलिनी अष्टांग योगच्या रूपात याला अनुशासनबद्ध, संपादित आणि निष्पादित केले. 


    प्राणायाम आणि ध्यान 

          प्राणायाम म्हणजे आपल्या श्वासोश्वासाचे नियंत्रण आणि विस्तारीकरण. श्वासोश्वसाच्या योग्य तंत्रांचा सराव केल्यास रक्तामधील आणि मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. त्यामुळे प्राणशक्ती आणि जीवन ऊर्जा यांच्या नियंत्रणास मदत होते. प्राणायाम आणि योगासने हे एकमेकास पूरक आहेत. या दोन योगतत्वांचा मिलाफ झाल्याने शरीर आणि मनाच्या उत्तम प्रतीचे शुद्धीकरण व आत्म नियमन प्राप्त होते. प्राणायाम ही ध्यानाच्या गहऱ्या अनुभवाची तयारी असते. 

         योगा हा केवळ एक व्यायामाचा प्रकार नाही तर शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचा सोपा मार्ग आहे. आपल्या आयुष्यात व्यायाम आणि योगाचे अतिशय महत्त्व आहे. दररोज योगा केल्याने ताणतणावपासून दूर होतो. तसेच हाडं, मांसपेशी आणि सांधे दणकट राहातात. योग केल्याने आपल्या शरीराला नवी ऊर्जा मिळते. योग आपल्याला विविध आजारांपासून दूर ठेवतो. तर यंदाच्या जागतिक योग दिन निमित्त मराठमोळी  योगाप्रेमींना शुभेच्छा!


    https://youtu.be/Rx2cLmMEavs



    No comments:

    Post a Comment