Friday, June 12, 2020

जैवविविधता

https://youtu.be/k6HtLvFMePw

जैवविविधता

 

जैविक विविधता बायोडाव्हर्सिटी (Biodiversity) किंवा जैवविविधता व्याख्येचे अनेक अर्थ निघतात. सामान्य व्याख्येप्रमाणे जैवविविधता म्हणजे जाति विविधता, आणि जातिमधील संपन्नता (जीवशास्त्रीय संपन्नता). जीवशास्त्रज्ञांच्या व्याख्येप्रमाणे “ जैवविविधता म्हणजे जनुकांची व्यक्तता, जातीमधील विविधता आणि परिसंस्थेमधील विविधता. जीवशास्त्रीय विविधता म्हणजे व्याख्येप्रमाणे (१). जातीमधील विविधता, (२) परिसंस्थेमधील विविधता आणि (३) जनुकीय विविधता म्हणजे जैवविविधता.
इसवी सनाच्या २००४मध्ये कार्डिफ विद्यापीठाने आणि पेंब्रुकशायर मधील डार्विन सेंटरच्या प्राध्यापक अ‍ॅन्थनी कॅंपबेल यांनी या व्याखेमध्ये रेण्वीय विविधतेची भर घातली.

इ.स.१९६८मध्ये रेमंड एफ दासमान या वन्य जीवांच्या अभ्यासकाने जैवविविधता या शब्दाचा प्रथम प्रयोग केला. हा शब्द त्यानी ‘अ डिफरंट काइंड ऑफ कंट्री’ या सामान्य वाचकांसाठी लिहिलेल्या पुस्तकामध्ये विविधता टिकवून ठेवण्याच्या संदर्भात वापरला. सुमारे दहा वर्षांतर, म्हणजे १९८०मध्ये विज्ञान आणि पर्यावरण कायद्याचा मसुदा बनवण्याच्या वेळी हा शब्द चांगलाच रूढ झाला होता. थॉमस लव्हजॉय यानी कॉन्झर्व्हेशन बायॉलॉजी या पुस्तकाच्या उपोद्‌घातामध्ये लिहून तो वैज्ञानिकांच्या समोर आणला. यापूर्वी ‘नॅचरल डायव्हर्सिटी-नैसर्गिक विविधता’ अशी संज्ञा १९७५ सालापासून वापरात होती. पण १९८०मध्ये रॉबर्ट ई जेनिन्स यानी अमेरिकेत जैविकविविधता असा शब्द रूढ करण्याचा प्रयत्न केला.  

जैवविविधता पृथ्वीवर समप्रमाणात पसरलेली नाही. पृथ्वीवरील जैवविविधतेमध्ये विस्ताराची विविधता आढळतेच, एवढेच नव्हे तर एकाच प्रदेशामध्ये सुद्धा सारखेपणा आढळून येत नाही. सजीवांमधील विविधता, तापमानावर, पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर, समुद्रसपाटीपासूनच्या उंचीवर, भूप्रदेशाच्या गुणधर्मावर, आणि सभोवती असलेल्या इतर सजीवांच्या अस्तित्वावर अवलंबून असते. सजीवांच्या देशी जाति आणि अप्रिसंस्थेच्या(?) वितरणाच्या अभ्यासास जैवभूगोल असे म्हणतात.
विषुववृताजवळील उष्णप्रदेशामध्ये विविधता अधिक तर ध्रुवीय प्रदेशामध्ये कमी विविधता आढळते, हे वर आलेच आहे. २००६मध्ये आययूसीएन या संस्थेने दुर्मीळ किंवा अस्तित्व धोक्यात आल्याचे जाहीर केलेल्या सजीवांची संख्या ४०,१७७ एवढी होती. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार अशा जातींची संख्या दहा लाखांवर पोहोचेल. भूप्रदेशावरील विविधता महासागरी विविधतेपेक्षा पंचवीस पटीनी अधिक आहे.

जैवविविधता विकास (उत्क्रांति)

आज अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेमागे ३५० कोटी वर्षांचा इतिहास आहे. सजीवांची नक्की निर्मिती केव्हा झाली हे जरी वैज्ञानिकाना सांगता आले नाही तरी पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर वीस ते तीस कोटी वर्षानंतर प्राथमिक रचना असलेले सजीव अस्तित्वात आले यावर वैज्ञानिक ठाम आहेत. साठ कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले सजीव आदिजीव, जीवाणू, असे एकपेशीय रचनेचे होते. चोपन्न कोटी वर्षापूवी फॅनरोझोइक कल्पामध्ये झालेल्या कॅंब्रियन युगामध्ये जैवविधतेमध्ये प्रचंड वाढ झाली. या प्रकारास कॅंब्रियन एक्स्प्लोजन असे म्हणण्याची पद्धत आहे. कॅंब्रियन युगामध्ये बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली. पुढील ४०कोटी वर्षामध्ये विविधतेमध्ये बहुतांशी अपृष्ठवंशी सजीव अधिक संख्येने होते. याच कालखंडात पृष्ठवंशी सजीव घातीय श्रेणीने वाढत गेले. या वाढीबरोबर अनेक पर्यावरणीय कारणाने जैवविविधतेचा नाश होत होता. समूह विलोपन क्रियेमुळे जैवविविधतेमध्ये घट आणि वृद्धी हे प्रकार सजीवांच्या निर्मितीपासून चाललेले आहेत. कार्बनिफेरस युगामध्ये झालेल्या विलोपनामध्ये पर्जन्यवने भूपृष्ठाखाली गाडली गेली. या काळात गाडल्या गेलेल्या जीवाश्मांवर उच्च दाब आणि कार्बन वेगळा होण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले दगडी कोळसा आणि क्रूड ऑइल आजच्या आपल्या इंधनाची ९०% गरज भागवत आहे. पंचवीस कोटी वर्षापूर्वी पर्मियन-ट्रायसिक युगाच्या संधिकालात झालेल्या विघटनाने जैवविविधतेची सर्वाधिक हानी झाली. (या काळात डायनोसॉर नष्ट झाले). या धक्क्यातून सावरण्यास पृष्ठवंशी सजीवाना तीन कोटी वर्षे लागली. गेल्या दोन तीन कोटी वर्षांच्या जीवाश्मांच्या अभ्यासावरून असे आढळून आले आहे की आजच्या एवढी जैवविविधता कधीही अस्तित्वात नव्हती. सर्व वैज्ञानिकांना हे म्हणणे पूर्णपणे मान्य नाही. जीवाश्मीकरण सर्व सजीवांचे कधीही प्रातिनिधित्व करू शकत नाही हा त्यांचा आक्षेप. काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार तीस कोटी वर्षापूर्वी आणि आजच्या जैवविविधतेमध्ये फारसा फरक नसावा. सध्याच्या सजीव जातींची संख्या दोन दशलक्ष ते शंभर दशलक्ष एवढी असावी. सर्व पर्यायाचा विचार करून सजीवांची संख्या १३० ते १४० लाखांपर्यंत पोहोचते. यांमधील संधिपाद प्राण्यांची संख्या सर्वाधिक आहे. ज्या ठिकाणी सजीवामध्ये संघर्ष कमी आहे म्हणजे निसर्ग निवडीच्या “फिटनेस” ला (डार्विंनचा सिद्धान्त) सामोरे जावे लागत नाही अशा ठिकाणी जैवविविधता वृद्धिंगत होते.

अधिकतम सजीव संख्या

पृथ्वीवर एका वेळी सर्वाधिक किती सजीव राहू शकतील ही पृथ्वी ग्रहाची सजीव धारण क्षमता झाली. उदा. एका हेक्टरमध्ये अधिकतम किती गव्हाचे उत्पादन घेता येईल याची जीवशास्त्रीय मर्यादा गणिताने काढता येते. जाति-विविधता किती असू शकेल याचा अंदाज काढता येतो. सागरी सजीवाची विविधता वृद्धिवक्र पद्धतीने तर भूमीवरील सजीवांची विविधता घातश्रेणीने वाढते. एका वैज्ञानिकाच्या म्हणण्याप्रमाणे चतुष्पाद प्राणी आजच्या घटकेला भूप्रदेशावरील ६४% प्रदेशातसुद्धा पोहोचलेले नाहीत. मानवी हस्तक्षेपाशिवाय चतुष्पाद सजीवांची वाढ अशा पद्धतीने होण्याची शक्यता आहे की सर्व प्रकारच्या परिसंस्थेमेध्ये चतुष्पाद पोहोचतील.
याउलट फेनेरोझोइक कालखंडामध्ये जैवविविधतेच्या वाढीचा आलेख अपास्ताकार (हायपरबोलिक) आकाराचा दिसतो. पहिल्या स्तरातील धन पुन:प्रदाय पद्धतीने (पॉझिटिव्ह फीडबॅक) होतो. जेवढी पूर्वजांची संख्या अधिक तेवढी त्यापासून निर्माण होणाऱ्या पिढ्यांची संख्या अधिक. वृद्धीसाठी आवश्यक घटकांचा तुटवडा असल्यास सजीवांची विविधता ऋण पुन:प्रदाय पद्धतीने कमी होते. अपास्ताकार वाढीचे आणखी एक उदाहरण म्हणजे मानवी लोकसंख्येमधील वाढ. तंत्रज्ञानाच्या वाढीबरोबर आणि कृषि क्षेत्रामधील सुधारणामुळे अजून मानवी लोकसंख्या चरम वृद्धि संख्येपर्यंत पोहोचली नाही.
मानवाच्या उदयाबरोबर आणखी एक विलोपन क्रिया चालू झाली आहे यावर बहुतेक वैज्ञानिकांचे एकमत होत आहे. यास होलोसीन मास एक्स्टिन्शन असे म्हणण्याची पद्धत आहे. होलोसीन या ग्रीक शब्दाचा अर्थ “आधुनिक” असा आहे. प्लाइस्टोसीन कालखंडाचा अस्त झाल्यानंतर होलोसीन युगाचा सुमारे ११,००० वर्षापूर्वी प्रारंभ झाला. इसपू १०,००० मध्ये कृषि व्यवस्थेचा प्रारंभ. परिसरामध्ये तंत्रज्ञान आणि अवजारांच्या मदतीने बदल करून नैसर्गिक अधिवास मानवास राहण्यायोग्य बनवणे हे होलोसीन युगाचे वैशिष्ठ्य. मानवी हस्तक्षेपामुळे सध्या विलोपन क्रिया एवढी झपाट्याने चालली आहे की फक्त १०० वर्षामध्ये इतर सजीवांचा नाश होण्याची शक्यता आहे.

सजीव जातींची संख्या

जागतिक सजीव वर्गीकरण विभागाने आणि युरोपियन डिस्ट्रिब्यूटेड इंस्टिट्यूट ऑफ टॅक्सॉनॉमी या संस्थानी सजीवांच्या प्रत्येक वर्गातील (फायला) एकूण जातींचा २०१०मधील केलेला अंदाज प्रत्यक्षात असलेल्या जातीहून कितीकरी कमी असावा असे म्हटले आहे.
  • १ ते कोटी कीटक
  • अर्धा ते १ कोटी जिवाणू
  • १५ लाख कवके
  • १० लाख अष्टपाद
  • सूक्ष्म जीवांची नक्की संख्या किती याचा अंदाज अजून आलेला नाही. जागतिक सागरी पाण्यातील सूक्ष्म जीवांची पाहणी केल्यानंतर असे आढळून आले की प्लवंगामधील सूक्ष्म जीवांमध्ये अधिक विविधता आहे. २००४-२००६मध्ये केलेल्या सूक्ष्म जीवांच्या अभ्यासानंतर सध्या ‘जाति’ या व्याख्येमध्ये ओळखले जाणाऱ्या सजीवांना काही मर्यादा आहेत.
सध्याचा जाति विलोपनाचा वेग वाढला आहे. हा वाढलेला वेग ध्यानात घेतला तर कित्येक जाति ओळखण्याआधी विलुप्त होण्याची शक्यता अधिक आहे.

जाति विलोपनाचा वेग

गेल्या शतकात जैवविविधतेमधील घट मोठ्या प्रमाणात लक्षात आली. २००७ मध्ये जर्मन फेडरल प्रशासनातील एक मंत्री सिग्मार गॅब्रिएल यानी सध्या अस्तित्वात असलेल्या प्रजातीमधील ३०% प्रजाति २०५० पर्यंत नष्ट होतील असे विधान केले. यापैकी ठाऊक असलेल्या वनस्पतींपैकी एक अष्टमांश विलोपनाच्या मार्गावर आहेत. हा विलोपनाचा वेग दरसाल १,४०,००० जाती एवढा प्रचंड आहे. हा धोका मुख्यत्वेकरून पर्यावरणातील असंतुलित बदलांमुळे आहे. आजपर्यंत कधी नव्हे एवढ्या वेगाने विलोपनाचा वेग वाढला आहे यावर बहुतेक वैज्ञानिकांचे एकमत झाले आहे.

जैवविविधतेस असणारे धोके

अधिवास नाहिसा होणे, अतिशिकार, नव्या अधिवासात नव्या जातींचा प्रवेश, आणि द्वितीय विलोपन यामुळे जैवविविधतेस धोका उत्पन्न होतो असे जेअर्ड डायमंड या निसर्गतज्‍ज्ञाने वर्णन केले आहे. एडवर्ड ओ विल्सन यानी जैवविविधतेच्या धोक्याचे संक्षिप्त रूप हिप्पो असे केले आहे. हॅबिटॅट डिस्ट्र्क्शन (अधिवास नाश), इन्व्हॅझिव स्पिशीज (नव्या ठिकाणी नको त्या जातीचा प्रवेश), ह्यूमन ओव्हर पॉप्युलेशन (मानवी लोकसंख्येची वाढ) आणि ओव्हर हार्वेस्टिंग (कृषि क्षेत्राची अनिर्बंध वाढ) असे केले आहे. “इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉंझरव्हेशन ऑफ नेचर”(आययूसीएन) या आंतरराष्ट्रीय संघटनेनुसार हे सर्व जैवविविधतेचे प्रत्यक्ष धोके आहेत.

अधिवास बदल

जैवविविधता विलोपनामध्ये अधिवास बदल किंवा अधिवास नाहीसा होण्याचा मोठा धोका उद्भवतो. सहाहरित जंगलामध्ये होत असलेली वृक्षतोड, लोकसंख्या वाढ, जंगलाच्या जमिनीमध्ये खाणकाम, हवा प्रदूषण, मृदा प्रदूषण आणि जलप्रदूषण याशिवाय जागतिक हवामान वाढ या सर्वाचा अधिवास बदलाशी संबंध येतो. अधिवासाचे क्षेत्रफळ आणि त्या अधिवासामध्ये असणाऱ्या जातींची संख्या परस्परांवर अवलंबून आहेत. त्यांतल्या त्यात आकाराने मोठ्या जाति व समुद्रसपाटीलगत असणाऱ्या जंगलातील जाति-अधिवासबदलास संवेदनक्षम आहेत. दक्षिण भारतातील सलग जंगलांचे पट्टे नष्ट झाल्याने पश्चिम घाट जंगलामधील हत्ती उन्हाळ्यात पीक क्षेत्रामध्ये घुसतात. ऊस हे त्याना त्यांचे नैसर्गिक खाद्य वाटल्याने ते तेथेच राहतात. त्याना हुसकून लावण्याचा प्रयत्न केल्यास ते परत परत तेथेच येत राहतात. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यानंतर पुनर्वनीकरणामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व वनस्पति परत कधीच लावता येत नाहीत. एकाच प्रकारच्या वृक्षांचे पट्टे लावण्याने त्या परिसरामध्ये असलेली विविधता नष्ट होते. नॅशनल सायन्स फाउंडेशन यानी केलेल्या २००७मधील अभ्यासामधून असे समजले की जैवविविधता आणि जनुकीय विविधता यांचा परस्पर संबंध आहे. जातींमधील विविधतेसाठी जातींमध्ये जनुकीय विविधता असणे आवश्यक आहे. एका घटकाचा अभाव म्हणजे दोन्हीमधील संतुलन संपणे. अशा वेळी परिसरामध्ये एकच जाति प्रबळ ठरते. पाळीव प्राण्यांच्या बाबतील हे सहज समजून येते. पशुपालनासाठी राखीव कुरणे म्हणजे फक्त दूध किंवा मांसासाठी जनावरे पाळणे. हाच प्रकार कृषिव्यवस्थेमध्ये घडतो. उत्पादन घटण्याच्या भीतीने दुसरी वनस्पति म्हणजे तण शेतामध्ये वाढू दिले जात नाही.


आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन- २२ मे

जगातील सर्व सजीवांची गणती अजूनही चालू आहे... कीटकांच्या नव्या प्रजाती अद्यापही सापडत आहेत ! जगातील माहित असलेल्या सजीवांपैकी ७८ टक्के प्रजातींची नोंद आपल्याकडे आढळते. या विविधतेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी हा ‘बायोडायव्हर्सिटी डे’ जगभर साजरा केला जातो.

पृथ्वीवरील जैवविविधता खरोखरीच थक्क करणारी आहे. तिच्याबाबत योग्य माहितीचा प्रसार झ्ल्यास तिचे संरक्षण करण्याबाबतही जागृती करता येईल; अशा विचाराने हा दिवस, सन २००० च्या आधीपासूनच साजरा केला जातो. २०१५ ते २०३० ह्या काळातील विकासाची संभाव्य दिशा लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने ‘शाश्वत विकासासाठी जैवविविधता संकल्पना’ ठरवली आहे. जैवविविधतेचे स्थान लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी भारत सरकारने २००२ मध्ये कायदा बनवला आहे. तर महाराष्ट्रात २००८ पासून जैवविविधता नियम लागू आहेत. त्यामध्ये रहिवाशांनीच आपल्या परिसराची जैवविविधता नोंदवही बनविण्याची संकल्पना आहे. सरकारी तसेच संस्थात्मक पातळीवर या दिवसानिमित्त अनेक उपक्रम राबविले जातात.

 

  https://youtu.be/k6HtLvFMePw

No comments:

Post a Comment