Thursday, April 7, 2016

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

गुढी पाडवा


     आपल्या देशात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा, संवत्सर प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपलेपणा वाटण्याचे कारण, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीयन होता. आपला पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतात कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. 
    चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी (पाडव्याला) प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला 14 वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. त्या रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या, त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो.
    त्या आनंदाचे प्रतीक म्हणून आपणही घरादाराला आंब्याची तोरणे बांधतो, फुलांच्या माळांनी घर सजवतो. सकाळी मुखमार्जनानंतर कडुनिंबाची कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच या समवेत द्यावीत असा प्रघात आहे. कारण कडुनिंब औषधी आहेच पण रसांसमवेत (आंबट, तुरट, तिखट यासारखा) याचे सेवन आयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहे.
    वर्षाच्या सुरवातीला मागच्या सगळ्या कडू गोष्टी गिळून टाकून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरू करा असे तर ही प्रथा सांगत नसेल?कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ करतात. कारण उन्हाळ्यात होणार्‍या त्वचारोगापासून बचाव करण्याचे सामर्थ्यही ह्यात आहे. लहानथोरांच्या जीवन शैलीत बदलत्या ऋतुमानानुसार बदल करून निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचाच मार्ग या परंपरेत आहे.
    गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करावी असे मानतात. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे. तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी.संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात. त्यापूर्वी तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात, धने उन्हाळ्यात उपयोगी तर उन्हातून आल्यावर पाणी देण्यापूर्वी गुळाचा खडा देण्याची प्रथा आहे. व त्यावरची साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात. या सर्व परंपरांतून लहानपणापासूनच आपण निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्यास शिकतो. पूर्वी आपले जीवनमान निसर्गाच्या लहरींवर त्याच्या उष्ण, शीत बदलांवर अवलंबून होते, त्यामुळे आपल्या प्रत्येक सणांतले बदल हे निसर्गाच्या बदलानुसार होतात.
     गुढी हे ब्रह्मध्वज आहे. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे ‍‍विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो. नवीन वर्षाचे अत्रुप असतं. पण हा तर आपल्या हिंदूचा अभ्यंगस्नानांनी सुरू होणारा पाडवा! प्रत्येक घरातील लहानथोरांनी नटूनथटून अलंकाराने सुशो‍भित होऊन गुढ्या उभारायचा दिवस, गोडधोडाचा दिवस, पंचांग पुजेचा दिवस, संवत्सर फल वाचनाचा दिवस, नवीन खरेदीचा दिवस, अन् सजलेल्या सालंकृत गृहलक्ष्मी बरोबरच चैत्रपालवीने नटलेल्या या धरतीच्या वसंत आगमनाच्या उत्साहाचा दिवस आपण ही दिमाखात साजरा करूया.
सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 

No comments:

Post a Comment