नाशिकचे वैभव श्री काळाराम मंदिर
काळाराम मंदिर व नाशिककर
यांचे अतूट नाते आहे. हे पंचवटीतील प्रमुख मंदिर असून या मंदिराची महती जगभर
वर्णिली जाते.. नाशिकला बाहेरचा माणूस आला की त्याचे काळाराम दर्शन ठरलेले असते.
ओढकर यांनी पुरातन लहानसे मंदिर बांधले होते. पुढे त्यांच्या वंशातील सरदार
खंडेराव ओढेकर यांनी सवाई माधवराव पेशवे व गोपिकाबाई यांच्या सल्लामसलतीवरून या मंदिराचा
जीर्णोद्धार केला. या मंदिराचे काम इ. स. १७७८ साली सुरू होऊन १७९० मध्ये पूर्ण
झाले. बांधकामाला १२ वर्षे लागली व २२ लाख रू. खर्च आला होता. मंदिरासाठी कोठेही
सिमेंट व चुना वापरलेला नाही. दगडावर दगड रचून त्यात खाचा तयार करून बांधलेले आहे.
रामशेज डोंगरातील काळ्या
पाषाणात हे नागर शैलीतील अतिभव्य, रेखीव मंदिर बांधण्यात आलेले आहे. हे मंदिर
प्राचीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरातील प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता,
लक्ष्मण यांच्या वालुकामय पाषाणातील, शामवर्णीय असल्याने या मंदिराला काळाराम हे
नाव प्राप्त झाले.
प्रभू श्रीराम येथे
वनवासात असताना गोदावरी उत्तर तीरावर आले तेव्हा येथील ऋषामुनींनी रामाला
राक्षसांच्या अत्याचाराची कहाणी कथन केली. त्यावेळी दंडकारण्यावर खर, त्रिशर,
दूषण, मारिच, शूर्पणखा या राक्षसांचे नियंत्रण होते. या राक्षसांकडून
यज्ञसंस्कृतींचा विध्वंस होत असल्याने राम क्रोधित झाले. त्यावेळी श्रीराम
काळस्वरूप भासत होते. म्हणून त्यांना ‘काळराम’ असे संबोधिले गेले. पुढे त्याचेच अपभ्रंश होऊन ‘काळाराम’ असे झाले.
रामाने राक्षसांना अभय दिल्याने येथे अभय मुद्रेतील रामाची मुर्ती आहे. रामाचा उजवा
हात छातीवर तर डावा हात पायाजवळ आहे.
या मंदिराचा आवार पूर्व
पश्चिम २९६ फूट व दक्षिणोत्तर १३८ फूट रूंद आहे. चारी दिशांना चार दरवाजे असून
पूर्व दरवाजा सर्वात मोठा आहे. त्यावर दुमजली नगारखाना बांधलेला आहे. मंदिराच्या
दक्षिण दरवाजातून गेल्यास खंडेराय मंदिर आहे. व नैऋत्यास गणेशाची स्थापना केलेली
आहे. मंदिरासमोर ४० खांबी प्रशस्त सभामंडप आहे. यात पूर्वभागी पश्चिमाभिमुख दास
मारूतीची मूर्ती आहे, मारूतीचे दर्शन घेऊन पश्चिमेकडे तोंड केल्यास श्रीरामाचे
दर्शन होते.
मेष व तुला या दोन
संक्रांतीत भूमध्य रेषेत येणारे सूर्यकिरण सूर्योदयाबरोबर श्रीमुखावर पडतात.
दरवर्षी येथे रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. रामनवमीच्या दिवशी
मध्यान्ही रामजन्माचा सोहळा होतो. चैत्र शु. ११ ला मंदिरापासून रथयात्रा निघते.
परंपरेने रथाची मिरवणूक काढली जाते.
No comments:
Post a Comment