पेशवेकालीन रहाडी - अनोखी परंपरा
नाशिकमध्ये आकर्षण ठरते ते येथील पेशवेकालीन रहाडीचे. महाराष्ट्रात पूर्वी होळी सण 5 दिवस साजरा केला जाई. आता मात्र राज्यात होळीच्या दुस-या दिवशी धुलिवंदनला रंग खेळतात. नाशिकने मात्र आपली जुनी परंपरा अजून जपलेली आहे, येथे होळीच्या दुस-या दिवशी होळीच्या राखेने धुळवड खेळले जाते व होळीच्या पाचव्या दिवशी पंचमीला रंगोत्सव नाशिककर साजरा करतात. येथे पेशवे काळातील रहाडींमध्ये पाणी व रंग मिसळून जलदेवतेची पूजा केली जाते. नंतर रहाडीत रंग खेळला जातो. ही शेकडो वर्षांची परंपरा नाशिकने जपली आहे. त्यामुळे येथील रंगपंचमीला आगळी-वेगळी ओळख लाभली आहे.
शेकडो वर्षांपासूनच्या रहाडी नाशकात पाहायला मिळतात. पूर्वी शहरात 21 ठिकाणी रहाडी होत्या, असे सांगितल्या जाते. शहरातील तिवंधा चौक, नाव दरवाजा आणि सरदार चौक अशा तीन ठिकाणी रहाडी आहेत. दरवर्षी रंगोत्सवात न्हाऊन निघण्यासाठी या पेशवेकालीन रहाडी खोदल्या जातात. त्यामध्ये फुलांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरले जातात. रहाडीत रंग खेळल्यानंतर विविध आजार दूर होतात असाही एक समज आहे. नाशिककरांची रंगपंचमी म्हणजे रहाडी असे समीकरण झाले.
पेशव्यांच्या काळात ही परंपरा सुरू झाली. ती आजही कायम आहे. पूर्वी जुने नाशिक आणि पंचवटी भागात चौकाचौकात रहाडी खणल्या जायच्या. मध्यंतरी रहाडीमुळे दुर्घटनांची संख्या वाढल्यामुळे जुन्या रहाडी बंद पडल्या आहेत. एका रहाडीत साधारणपणे 30 ते 40 हजार लिटर पाणी एकावेळी वापरले जाते. पण यंदा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई असल्याने परंपरांना फाटा दिला आहे.