Thursday, April 14, 2016

श्री काळाराम मंदिर - रामनवमीच्या शुभेच्छा!



नाशिकचे वैभव श्री काळाराम मंदिर


काळाराम मंदिर व नाशिककर यांचे अतूट नाते आहे. हे पंचवटीतील प्रमुख मंदिर असून या मंदिराची महती जगभर वर्णिली जाते.. नाशिकला बाहेरचा माणूस आला की त्याचे काळाराम दर्शन ठरलेले असते. ओढकर यांनी पुरातन लहानसे मंदिर बांधले होते. पुढे त्यांच्या वंशातील सरदार खंडेराव ओढेकर यांनी सवाई माधवराव पेशवे व गोपिकाबाई यांच्या सल्लामसलतीवरून या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचे काम इ. स. १७७८ साली सुरू होऊन १७९० मध्ये पूर्ण झाले. बांधकामाला १२ वर्षे लागली व २२ लाख रू. खर्च आला होता. मंदिरासाठी कोठेही सिमेंट व चुना वापरलेला नाही. दगडावर दगड रचून त्यात खाचा तयार करून बांधलेले आहे.
रामशेज डोंगरातील काळ्या पाषाणात हे नागर शैलीतील अतिभव्य, रेखीव मंदिर बांधण्यात आलेले आहे. हे मंदिर प्राचीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरातील प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता, लक्ष्मण यांच्या वालुकामय पाषाणातील, शामवर्णीय असल्याने या मंदिराला काळाराम हे नाव प्राप्त झाले.
प्रभू श्रीराम येथे वनवासात असताना गोदावरी उत्तर तीरावर आले तेव्हा येथील ऋषामुनींनी रामाला राक्षसांच्या अत्याचाराची कहाणी कथन केली. त्यावेळी दंडकारण्यावर खर, त्रिशर, दूषण, मारिच, शूर्पणखा या राक्षसांचे नियंत्रण होते. या राक्षसांकडून यज्ञसंस्कृतींचा विध्वंस होत असल्याने राम क्रोधित झाले. त्यावेळी श्रीराम काळस्वरूप भासत होते. म्हणून त्यांना काळराम असे संबोधिले गेले. पुढे त्याचेच अपभ्रंश होऊन काळाराम असे झाले. रामाने राक्षसांना अभय दिल्याने येथे अभय मुद्रेतील रामाची मुर्ती आहे. रामाचा उजवा हात छातीवर तर डावा हात पायाजवळ आहे.
या मंदिराचा आवार पूर्व पश्चिम २९६ फूट व दक्षिणोत्तर १३८ फूट रूंद आहे. चारी दिशांना चार दरवाजे असून पूर्व दरवाजा सर्वात मोठा आहे. त्यावर दुमजली नगारखाना बांधलेला आहे. मंदिराच्या दक्षिण दरवाजातून गेल्यास खंडेराय मंदिर आहे. व नैऋत्यास गणेशाची स्थापना केलेली आहे. मंदिरासमोर ४० खांबी प्रशस्त सभामंडप आहे. यात पूर्वभागी पश्चिमाभिमुख दास मारूतीची मूर्ती आहे, मारूतीचे दर्शन घेऊन पश्चिमेकडे तोंड केल्यास श्रीरामाचे दर्शन होते.
मेष व तुला या दोन संक्रांतीत भूमध्य रेषेत येणारे सूर्यकिरण सूर्योदयाबरोबर श्रीमुखावर पडतात. दरवर्षी येथे रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. रामनवमीच्या दिवशी मध्यान्ही रामजन्माचा सोहळा होतो. चैत्र शु. ११ ला मंदिरापासून रथयात्रा निघते. परंपरेने रथाची मिरवणूक काढली जाते.
 

Sunday, April 10, 2016

आदिशक्ती श्री सप्तश्रृंगी देवी



आदिशक्ती श्री सप्तश्रृंगी देवी


महाराष्ट्रात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरगडची रेणुका माता
ही पूर्ण पीठे आहेत. या तिन्ही स्थानांप्रमाणेच श्रेष्ठ असे अर्धपीठ सह्याद्री पर्वतरांगेतील सप्तश्रृंगी हे स्थान होय अशी देवीची महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आहेत. इंद्राणी, कार्तिकेय, वाराही, वैष्णवी, शिवा, चामुंडा व नरसिंह या सात देवतांचे वास्तव्य डोंगरांच्या सात शिखरांवर आहे. म्हणून या गडास सप्तश्रृंग असे म्हटले जाते. समुद्र सपाटीपासून 4500 फूट उंचीवर हे शक्तीपीठ आहे.
सप्तश्रृंग गडासमोर पूर्वेला मार्कंडेय ऋषींचे देवस्थान मार्कंडेय डोंगरावर आहे. मार्कंडेय ऋषींनी घोर तप केल्यानंतर देवी प्रसन्न झाली व त्यांनी या गडावर देवीची स्थापना केली. सप्तशती ग्रंथानुसार रंभ दैत्याचा पुत्र महिषासूराने खूप धुमाकूळ घातला. त्यामुळे देवांनी होम करून देवीला प्रसन्न करून आपापली शस्त्रे दिली. त्या शस्त्रांचा वापर करून देवीने महिषासूरांचा वध केला. व त्याच ठिकाणी वास्तव्य केले. काहींच्या मते हे श्री जगदंबेचे स्वयंभू स्थान आहे.
सिंहावर आरूढ, अठरा भूजा धारण केलेल्या या त्रिगुणात्मक दर्शन घेऊन पूजन केल्यास भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात. देवीची मुर्ती अखंड शीळा कोरून तयार केलेली आहे. इ. स. 5व्या किंवा 6व्या शतकात ही मुर्ती कोरली असावी. धारदार नाक, कपाळावर ठसठशीत कुंकू, कर्णफुले, नथ, मुखी फुलविडा, हातात शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशुल, कमंडलू इ. 18 शस्त्रे धारण केलेली, मस्तकावर मुकुट  अशी अलंकृत मुर्ती अतिभव्य आहे. मंदिराला खांबांची महिरप, भव्य सभामंडप व डोंगर कपारी, उंच सुळे असलेल्या पाषाणालगत उंचावर असलेल्या मंदिराला लाभलेले निसर्गरम्य वातावरण मनाला आनंद देते.
संत निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरी समाधी घेण्यापूर्वी देवीचे दर्शन घेतले होते. नाथ संप्रदायाने सांबरी विद्या याच गडावर प्राप्त केली. छत्रपतू शिवराय, पेशवे बाळाजी विश्वनाथ, समर्थ रामदास, श्रीरामकृष्ण परमहंस आदींनी या देवीची आराधना केल्याचा उल्लेख आढळतो.
परिसरात सरस्वती, लक्ष्मी तांबूल, अंबाल्य, शितला, कालिका, सूर्य, दत्तात्रय अशी 8 पाण्याची कुंडे आहेत. सिद्धेश्वर महादेवाचे हेमाडपंथीय मंदिर, शिवालय हे पुण्यकारक व पवित्र स्नान कुंड आहे. यास गिरिजातीर्थ असेही म्हणतात. शिवतीर्थाजवळ 1200 ते 1500 फूट खोल सतीचा कडा / शितकडा आहे.
देवीच्या चैत्र महिन्यात पौर्णिमेला मोठी यात्रा भरते.. लाखो. भाविक महाराष्ट्र तसेच देशाच्या कानाकोपर्यातून दर्शनासाठी येतात. इच्छापूर्तिसाठी येथे नवस बोलले जातात. तसेच आश्विन महिन्यात नवरात्रोत्सवात 9 दिवस होमहवन, शतचंडी पठण केले जाते. वर्षातून चैत्र महिन्यात व विजयादशमी या 2 दिवशी नवा ध्वज फडकवला जातो. शिखरावर पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग दिसत नसतानाही ध्वजारोहण हे अवघड, आश्चर्यकारक कार्य परंपरेने पार पाडले जाते.

Thursday, April 7, 2016

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

गुढी पाडवा


     आपल्या देशात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा, संवत्सर प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपलेपणा वाटण्याचे कारण, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीयन होता. आपला पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतात कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. 
    चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी (पाडव्याला) प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला 14 वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. त्या रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या, त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो.
    त्या आनंदाचे प्रतीक म्हणून आपणही घरादाराला आंब्याची तोरणे बांधतो, फुलांच्या माळांनी घर सजवतो. सकाळी मुखमार्जनानंतर कडुनिंबाची कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच या समवेत द्यावीत असा प्रघात आहे. कारण कडुनिंब औषधी आहेच पण रसांसमवेत (आंबट, तुरट, तिखट यासारखा) याचे सेवन आयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहे.
    वर्षाच्या सुरवातीला मागच्या सगळ्या कडू गोष्टी गिळून टाकून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरू करा असे तर ही प्रथा सांगत नसेल?कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ करतात. कारण उन्हाळ्यात होणार्‍या त्वचारोगापासून बचाव करण्याचे सामर्थ्यही ह्यात आहे. लहानथोरांच्या जीवन शैलीत बदलत्या ऋतुमानानुसार बदल करून निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचाच मार्ग या परंपरेत आहे.
    गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करावी असे मानतात. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे. तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी.संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात. त्यापूर्वी तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात, धने उन्हाळ्यात उपयोगी तर उन्हातून आल्यावर पाणी देण्यापूर्वी गुळाचा खडा देण्याची प्रथा आहे. व त्यावरची साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात. या सर्व परंपरांतून लहानपणापासूनच आपण निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्यास शिकतो. पूर्वी आपले जीवनमान निसर्गाच्या लहरींवर त्याच्या उष्ण, शीत बदलांवर अवलंबून होते, त्यामुळे आपल्या प्रत्येक सणांतले बदल हे निसर्गाच्या बदलानुसार होतात.
     गुढी हे ब्रह्मध्वज आहे. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे ‍‍विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो. नवीन वर्षाचे अत्रुप असतं. पण हा तर आपल्या हिंदूचा अभ्यंगस्नानांनी सुरू होणारा पाडवा! प्रत्येक घरातील लहानथोरांनी नटूनथटून अलंकाराने सुशो‍भित होऊन गुढ्या उभारायचा दिवस, गोडधोडाचा दिवस, पंचांग पुजेचा दिवस, संवत्सर फल वाचनाचा दिवस, नवीन खरेदीचा दिवस, अन् सजलेल्या सालंकृत गृहलक्ष्मी बरोबरच चैत्रपालवीने नटलेल्या या धरतीच्या वसंत आगमनाच्या उत्साहाचा दिवस आपण ही दिमाखात साजरा करूया.
सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 

Monday, April 4, 2016

नाशिकची ओळख : वाईन कॅपिटल ऑफ इंडिया



नाशिक : वाईन कॅपिटल ऑफ इंडिया

    वाईन म्हटले की नाशिक असे समीकरण झाले आहे. नाशिक जिल्ह्या देशातील सर्वांत जास्त वाईनरी कंपन्या असल्याने देशाचे वाईन कॅपिटल अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात 1999 ते 2009 या कालावधीत 35 वाईनरी प्रकल्प सुरू झाले. त्यांची सुमारे १ कोटी लिटरपर्यंत वाईन उत्पादनाची क्षमता आहे. त्यातील सुमारे ५० लाख लिटर वाईन्स भारतात विकली जाते. तर ७ लाख लीटरपर्यत वाईन निर्यात होते. अल्पावधीत वाईन उद्योग भरभराटीला येण्यामागे येथील भौगोलिक वातावरण आणि पूरक सोयी सुविधा हे प्रमुख कारण आहे.
    नाशिक हे देशाचे वाईन कॅपीटल म्हणून ओळखल्या जाण्यामागची गेल्या दशकातील वाटचाल विलक्षण आहे. १९९९ ते २००९ या दशकात जिल्ह्यात ३५ वाईनरी सुरू झाल्या. २० हजार लिटर ते ५० लाख लिटरपर्यंत वाईन्स निर्मितीची क्षमता या वाईनरीत आहेत. महाराष्ट्र द्राक्ष प्रक्रिया उद्योग धोरणामुळे हे घडले. २००१ ला द्राक्ष प्रक्रिया जाहीर होण्यापूर्वी नाशिकला फक्त पिंपेन को-ऑपरेटिव्ह लि. आणि सामंत सोना वाईन्स लि या दोनच वाईनरी होत्या. यानंतर २००१ ला धोरण जाहीर झाल्यानंतर 33 वाईनरी प्रकल्प उभारले गेले.
    नाशिकला व्यवसाय निमित्ताने येणा-या विदेशी पाहुण्यांचे या वाईनरी आकर्षण बनल्या आहेत. तसेच मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नागपूर आणि कोकणातून येणारे उद्योजक तसेच येथील व्यावसायिकही नाशिकच्या वाईन उद्योगांना भेटी देतात, वाईन  व फुडचा आस्वाद घेतात.     नाशिकच्या वाईन्स विदेशी लोकांच्या पसंतीस उतरल्या आहेत; नाशिकच्या वाईन उद्योगातील भरारीमुळे भारतात उच्च प्रतीची वाईन निर्माण होते हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता भारतीय वाईन उद्योगांत विदेशी गुंतवणूक व्हावी, वाईन पर्यटन वाढावे आणि रिसोर्टस्‌ हा आता प्रमुख उद्योग होण्याच्या दिशेने येथील वाईन-यांचे व्यवस्थापन सुरु झाले आहे. देशभरात वाईन्सची विक्री वाढू लागली आहे. जिल्ह्याच्या वाईन उद्योगाची वाटचाल अवघी १२ वर्षाची म्हणजे जेमतेम एक तपाची आहे. वाईनला जागतिक मार्केट उपलब्ध हो शकल्यास आणि पंचतारांकित हॉटेलांमध्ये नाशिकच्या भारतीय वाईन्सला जागा मिळाल्यास अल्पावधीत नाशिकची वाईन जागतिक स्तरावर स्वताची ओळख निर्माण करु शकेल. अशा स्थितीत नाशिकचा वाईनरी उद्योग आहे.
    मध्यंतरी नाशिक जिल्ह्यात सुमारे पाचशे एकरावर शारडोने, शेने ब्लॉक, स्टीन, सोव्हिनिओ ब्लॉंक, रिझलिंग, सेमिलॉन, ट्रिबिआना, व्हिओनये, पालोमिनो, शिराज आदी जातीच्या, वाईनरीसाठी उपयुक्त असणाऱ्या द्राक्षांची लागवड करण्यात आली. मध्यंतरीच्या काळात वाईनरीच्या द्राक्षे विक्रीत अडचणी निर्माण झाल्यानंतर या वाईनरीच्या वाणांच्या द्राक्ष बागा तोडण्यात आल्या, त्यात 1-2 एकरावर लागवड केलेल्या द्राक्षबागांची संख्या मोठी आहे.
    जगाच्या द्राक्ष उत्पादनात नाशिकचा ६० टक्के वाटा असल्याने नाशिकला द्राक्षपंढरी म्हटले जाते. या द्राक्षपंढरीत जानेवारी ते एप्रिल पर्यंत द्राक्ष काढणीचा हंगाम असतो आणि हाच हंगाम द्राक्ष उत्पादकांचा उत्सव असतो. या कालावधीत सुमारे ५ ते ६ हजार द्राक्ष कंटेनर्सची निर्यात होते. या हंगामात पोषक हवामान व उत्तम वातावरण असल्याने देश विदेशातील पर्यटकही येतात. यामुळे या कालावधीत या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षी आयोजित केलेल्या वान महोत्सवाला वा प्रेमींनी उदंड प्रतिसाद मिळाला. नाशिकची नवीन ओळख निर्माण व्हावी. नाशिकचा ब्रॅण्ड निर्माण करणे, कृषी पर्यटनाला चालना देणे, देशात शेतीला पर्यटनाची जोड देणे, पर्यटकांना ग्रामीण भागाकडे आकर्षित करणे, नाशिकची शेती व शेतीतन पर्यटन उद्योग, नाशिकचे वातावरण, येथील माती व माणूस यांचा मिलाफ करणे, मानवाला निसर्गाशी जोडणे, वानचा विकास, वान उद्योगाला हातभार लावणे, वानचे मार्केटींग, वान सोबत येथील खाद्य संस्कृती स्थानिक कला अविष्कार यांना प्राधान्य देणे हे या वाईन फेस्टीव्हल भरवण्यामागचे उद्देश असते.
      वानची गोड-आबट झिंग आणणारी चव... पेंटाग्राम बॅण्डच्या साथीने धरला जाणारा ताल...
देशी, परदेशातील रॉकस्टार्सचा धुंद करणारा रॉक जल्लोष... रामाला कुंद हवेतील टेन्ट आणि
वानच्या विविध रंगांत मिसळून रंगीबेरंगी प्रकाशातील आनंद... अर्थातच हा माहोल आहे आपल्या नेहमीच्याच सुला फेस्टचा. नाशिकची नवी ळख असलेला सुला फेस्ट फेब्रुवारीला नाशिकच्या सुला विनियार्डमध्ये भरवला जातो. वानप्रेमी मोठ्या संख्येने यात सहभागी होतात.
    जगभरातील अव्वल पाच वाइन फेस्टिव्हलमध्ये गणना होणाऱ्या सुला फेस्टमध्ये नामवंत कलाकार द्वारे सादर होणारे विविध रॉक बॅण्डचा आनंद रसिकांना लुटता येतो. वानच्या चवीसोबतच तरुणाईला थिरकण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची इलेक्ट्रिक्स डान्स म्युझिक सिस्टिम (ईडीएम), एल अॅक्टोस्टिक के वन पी म्युझिक सिस्टिमचा भारतात प्रथमच वापर गेली. त्यासोबतच स्थानिक टॅरकार्ड शो, टॅट्यूज, फॅशनशो अन‌् बरेच काही, विनियार्डमध्ये सुमारे चार एकर जागेवर फूड स्टॉल, शॉपिंग स्टॉल, वारली पेंटींग कलाकारांचीही साथ लाभल्याने आदिवासी संस्कृती, भारतीय परंपरा आणि ग्लोबलायझेशन असे कॉम्बिनेशन येथे बघायला मिळते.